उदगीर एमआयडीसीत दोन गटांत हाणामारी
By आशपाक पठाण | Published: May 14, 2023 05:58 PM2023-05-14T17:58:22+5:302023-05-14T17:58:43+5:30
परस्परविरोधी तक्रार : दोन्ही गटाच्या १३ जणांवर गुन्हा
उदगीर (जि.लातूर) : येथील एमआयडीसी भागात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. याबाबत दोन्ही गटाकडून तक्रार देण्यात आली असून या प्रकरणात १३ जणांवर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर एमआयडीसी भागात एका हॉटेलवर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला चहा बनवीत असताना आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या मुलास व इतरास मारहाण करून टेबल खुर्च्याची तोडफोड केली. फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली. यावरून राजूद्दिन शेख, अमीर शेख, अल्ताफ शेख, अरबाज शेख, सोहेल इस्माईल शेख (रा . सर्व लोणी ता.उदगीर) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळे करीत आहेत.
खुर्च्या पाडल्याच्या कारणावरून मारहाण...
याच घटनेत फिर्यादी राजोदीन शेखलाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनील फड, गणेश बाबुराव पाटील, निखिल विजयकुमार बिरादार, प्रशांत सूर्यकांत सताळे, ईश्वर चव्हाण, प्रशांत सीताराम डोईफोडे, लक्ष्मण सूर्यवंशी (रा. सर्वजण लोणी) यांनी संगनमत करून फिर्यादी हे हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले असता खुर्च्या पडल्याच्या कारणावरून फिर्यादीस सिमेंटच्या ठोकळ्याने गुडघ्यावर व पाठीवर मारून दुखापत केली. शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीची गावातील रोडच्या कडेला असलेली पानपट्टी जाळून टाकली. अशी तक्रार दिल्यावरून सात जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.