शिक्षणाचा नवा पॅटर्न देणाऱ्या लातुरात महापालिका शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत

By हणमंत गायकवाड | Published: September 15, 2023 05:56 PM2023-09-15T17:56:57+5:302023-09-15T17:59:34+5:30

विशेष म्हणजे काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन अर्थात खिचडी उघड्यावर शिजविली जाते.

Classrooms of municipal schools in Latur, which offers a new pattern of education, are in a dangerous condition | शिक्षणाचा नवा पॅटर्न देणाऱ्या लातुरात महापालिका शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत

शिक्षणाचा नवा पॅटर्न देणाऱ्या लातुरात महापालिका शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत

googlenewsNext

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या एकूण १८ शाळा असून पहिली ते आठवीच्या दोन, पहिली ते दहावीपर्यंतची एक शाळा असून यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्यांची अवस्था बिकट झालेली आहे. किचन शेडसह स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन अर्थात खिचडी उघड्यावर शिजविली जाते. दरम्यान, एका शाळेतील साहित्यही चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.

शैक्षणिक पॅटर्नमुळे लातूरची देशभरात ओळख असली तरी लातूर मनपाच्या शाळांची अवस्था मात्र बिकट आहे. स्वच्छतागृहांसह अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास, त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वच्छतागृह, किचन शेड नसणे, छतांना गेलेले तडे, वारा आणि पावसामुळे छताचे तुकडे वर्गात पडतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यासह जिवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाला निवेदन...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाला शाळा दुरुस्तीच्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. शाळा क्रमांक २६, शाळा क्रमांक ५, शाळा क्रमांक १३ तसेच शाळा क्रमांक ९ आदी शाळांच्या किचन शेड, स्वच्छता गृहांची दुरवस्था झाली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, माजी नगरसेविका इर्शाद तांबोळी, उमाकांत जाकीर तांबोळी, विशाल देवकते, आदर्श उपाध्ये, उस्मान शेख, बरकत शेख, इब्राहिम शेख, मोईन शेख, फारुक शेख, इरफान शेख, फिरोज पठाण, मुन्ना तळेकर आदींची नावे आहेत.

खासदार, आमदारांना शाळा दुरवस्थेचा अल्बम देणार....
पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनाही लातूर मनपाच्या शाळांच्या दुरवस्थेचा फोटो अल्बम दिला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरविली जाईल, असेही या निवेदनात आहे.

शाळेतल्या साहित्याची चोरी....
लेबर कॉलनी येथील शाळा क्रमांक २६ ची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृह, किचन शेड नाहीत. या शाळेतील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पोलिसांत दिली आहे. शाळेला साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.शाळा क्रमांक २६ च्या मुख्याध्यापकांनी शाळेतील लोखंडी मालमत्तेचे नुकसान तसेच काही साहित्य चोरी गेल्याची तक्रारी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिली आहे. 

चालू आर्थिक वर्षासाठी ०.११ कोटींची तरतूद...
शिक्षण खर्चासाठी ०.११ कोटींची तरतूद महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात केली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांच्या इमारतींची डागडुजी नाही. वर्गखोल्या नादुरुस्त आहेत.किचन शेड आणि स्वच्छतागृहांचा प्रश्न बिकट आहे. शिवाय, जिल्हा वार्षिक योजना निधीतूनही लाखोंचा निधी शिक्षणासाठी मिळतो. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, सुरक्षेसाठी हा निधी खर्च होतो का, हा प्रश्न आहे.

पाहणी करून दुरूस्ती
ज्या शाळांची दुरवस्था झाली आहे. त्या शाळांच्या दुरूस्तीबाबत कार्यवाही केली जाईल. बहुतांश सर्व शाळांची स्थिती चांगली आहे. यापुर्वी डागडुजी करण्यात आली आहे. पाहणी करून दुरूस्तीचे काम केले जाईल. संबंधितांना तशा सूचना केल्या आहेत. 
- शिवाजी गवळी, अप्पर आयुक्त मनपा, लातूर

Web Title: Classrooms of municipal schools in Latur, which offers a new pattern of education, are in a dangerous condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.