गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

By हरी मोकाशे | Published: July 20, 2023 06:40 PM2023-07-20T18:40:20+5:302023-07-20T18:41:10+5:30

गावातील खाजगी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.

Close private institutions and save ZP schools; Discussion of resolution of Sindkhed Gram Panchayat | गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

googlenewsNext

निलंगा : जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असले तरी दुसरीकडे गावोगावी शैक्षणिक खाजगी संस्थांना मान्यता देत आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत. गावातील खाजगी संस्थेची मान्यता रद्द करून जिल्हा परिषद शाळेला प्रोत्साहन द्यावे, असा ठराव तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीने घेतला आहे.

निलंग्यापासून ५ किमीवर असलेल्या सिंदखेड येथे जिल्हा परिषद शाळा आहे. तिथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून ८० विद्यार्थी अन् ७३ विद्यार्थिनी अशी एकूण १५३ पटसंख्या आहे. शाळेत एकूण ८ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रशासनाने गावात खाजगी शिक्षण संस्थेस परवानगी देऊन इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली. वास्तविक ही शिक्षण संस्था शाळेच्या दोन किमी अंतराच्या आत असल्याने तत्कालिन संस्थाध्यक्ष जलिलमियाँ देशमुख यांनी इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करणार नाही, असे लेखी शपथपत्र दिले होते. तद्नंतर विद्यमान संस्था चालकांनी पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाची मान्यता आणली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास सुरुवात झाली. ही बाब ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामसभा घेऊन गावातील खाजगी संस्थेच्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गांची मान्यता रद्द करुन हे विद्यार्थी शाळेस वर्ग करण्यात यावेत, असा ठराव घेतला. तसेच ही संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.

निवेदनावर सरपंच नागनाथ आंबिलपुरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अब्रार देशमुख, बालाजी शेडुळे, संभाजी बोलसुरे, राम माडीबोने, सुधाकर पानबोने, कांत जाधव, रावसाहेब आंबिलपुरे, दिलीप मठपती, दिगंबर बऱ्हाणपूरे, सिद्राम कुंभार, संदीप पानबोने, अहमद शेख आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तीन वर्षांपासून शाळेचा पट घसरला...
गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. सन २०२१-२२ मध्ये पटसंख्या २१४ होती. सन २०२२-२३ मध्ये १८६ होती. आता केवळ १५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या दोन- तीन वर्षात जिल्हा परिषदेची शाळा बंद पडेल.
- नागनाथ अंबिलपुरे, सरपंच.

शैक्षणिक दर्जा वाढविल्याने पट वाढला...
आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करीत नाही. आम्ही आमच्या संस्थेचा शैक्षणिक दर्जा वाढविला आहे. दररोजच्या शाळेच्या तासिकांशिवाय अतिरिक्त ज्यादा तास घेऊन शिक्षण दिले जाते. त्यामुळे पालक स्वत:हून आपल्या पाल्यांना येथे आणतात. शिवाय, परिसरातील खेड्यातून येथे विद्यार्थी येतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येवर काही परिणाम होणार नाही.
- अंजन पटेल, मुख्याध्यापक, लालबहादूर शास्त्री विद्यालय.

Web Title: Close private institutions and save ZP schools; Discussion of resolution of Sindkhed Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.