जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:39 PM2023-01-28T17:39:20+5:302023-01-28T17:40:04+5:30

यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन :ग्राम रोजगार सेवकांसमोरही यक्ष प्रश्न :कामांचा पुरता बोजवारा

Closure of all activities under the Employment Guarantee Scheme due to oppressive conditions; The laborers are starving | जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

Next

- व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर ( लातूर) :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी गावांतील ग्राम रोजगार सेवकाकडून  एन.एम.एम. एस.(नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम) प्रणाली द्वारे दिवसातून दोन वेळा  जिओटॅग करून मोबाईलवर कार्यस्थळाची फोटो घेवून मजुरांचे हजेरीपट करण्याच्या जाचक अटीमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्व कामे बंद झाली आहेत. या बंद झालेल्या कामांमुळे गावागावांतील मजुरांची उपासमार सुरू झाली आहे. अशातच या यंत्रणेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ,तांत्रिक सहाय्यक व  सिडीईओ ऑपरेटर हे सर्व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू केल्यामुळे  या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजूरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी गावांतील ग्राम रोजगार सेवकामार्फत मोबाईल एन. एम. एम. एस.या अँप चा वापर करून  दिवसातून दोन वेळा(सकाळी ६ते ११या वेळात व दुपारी २ते ४वाजेपर्यंत)  फोटो घेणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीच्या रोजगार सेवकांना मोबाईल देण्यात आलेला नाही.ज्या ग्राम रोजगार सेवकाकडे मोबाईल आहे.त्याच्या  मोबाईलला ग्रामीण भागात  नेट राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात हे अँप चालत नाही. शिवाय गावांतील एका रोजगार सेवकाकडे  मग्रारोहयो ची रस्ते,रोपवाटिका, सार्वजनिक विहिरी,अमृत सरोवर,अंगणवाडी बांधकाम ,बिहार पॅटर्न वृक्ष लागवड ही कामे गावागावांतून सुरू असल्यामुळे या दिलेल्या वेळात वरील कामांना भेटी देवून  मोबाईल अँपवर मजुरांचे फोटो घेण्यासाठी  वेळ पुरत नाही. एका गावात ही सर्व कामे वेगवेगळ्या ठिकाणी ५ते१०कि. मी. अंतरावर सुरू असल्याने रोजगार सेवकांना या वेळेत मजुरांच्या कामावर पोहचून मोबाईल अँपवर फोटो घेता येत नाहीत.मोबाईल अँपवर मजुरांचा फोटो  दिवसांतून दोन वेळा आला असेल तरच त्या मजुराला दिवसाची मजुरी मिळणार आहे. अशी जाचक अट या आदेशात असल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत सुरू असलेली मग्रारोहयो ची सर्व कामे आता बंद पडली आहेत.ही कामे बंद पडल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.

रोहयो कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लार्क कम डाटा ऑपरेटर यांच्या शासनाकडून प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यामुळे या यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी २६जानेवारी पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास ग्राम रोजगार सेवक संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज घडीला या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. रोपवाटिकेतील रोपें वाळू लागली आहेत तर लागवड केलेली  रोपें शेवटची घटका मोजू लागली आहेत.

जाचक अटी तात्काळ मागे घ्याव्यात
ग्राम रोजगार सेवकां ऐवजी संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी मजुरांची उपस्थिती नोंदवावी. एन. एम. एम. एस. मोबाईल अँप चा वापर करून उपस्थित मजुरांचे जिओ टॅग केलेल्या दिवसांतून दोन वेळा छायाचित्रांसह कार्यस्थळावरील मजुरांची उपस्थिती घेणे बंधनकारक केल्याची जाचक अट तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा मग्रारोहयोच्या कामांना कायमची खीळ बसणार आहे.
- अभिजित साकोळकर, सरपंच, देवर्जन.

प्रश्न मार्गी लावा अन्यथा
रोहयो मानद कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून वाढत्या महागाईत २७हजार १४४मानद कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा ,मुलांच्या शिक्षणाचा ,आरोग्याचा प्रश्नांची सोडवणूक करून  न्याय देण्याची कृपा करावी  अन्यथा  होणाऱ्या परिणामास  शासन जबाबदार राहील. असा इशारा राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष  विलासराव जोगदंड यांनी दिला आहे.

Web Title: Closure of all activities under the Employment Guarantee Scheme due to oppressive conditions; The laborers are starving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.