औरादमध्ये ढगफुटी; दीड तासांमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:51 PM2020-09-17T18:51:19+5:302020-09-17T18:57:06+5:30
गावात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
औराद शहाजानी (जि. लातूर) : औरादसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून, दीड तासांमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने तेरणा नदीवरील सात बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत.
औराद परिसरात झालेल्या या मोठ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे ससारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. जुने गाव व नवीन वस्त्यांतील बांधलेल्या नाल्या तुंबल्या होत्या. अभिनव कॉलनीत अनेकांच्या घारात पाणी शिरले. राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग ७५२ क्रमांकाचे काम संथगतीने सुरू असून, पावसाचा फटका यालाही बसला आहे. मांजरा नदीवरील वांजरखेडा व तेरणा नदीवरील तगरखेडा, औराद, सोनखेड, गुंजरगा, लिंबाळा, किल्लारी, मदनसुरी येथील उच्चस्तरीय बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
महामार्गाला नदीचे स्वरुप...
लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरुप आले असून, कमरेपर्यंत पाणी वाहत आहे. या पाण्यामध्ये अनेकांचे संसारोपयोगी व व्यापाऱ्यांचे साहित्य वाहून गेले. खत गोडावून, हॉटेल, दवाखाना, किराणा आदी दुकानांमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले.