औराद शहाजानीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती,रस्ते खरडून गेल्याने मोठे नुकसान
By संदीप शिंदे | Published: July 9, 2024 03:19 PM2024-07-09T15:19:05+5:302024-07-09T15:19:21+5:30
सोमवारी रात्री ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरामध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते बारा वाजेदरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, औराद-तगरखेडा रस्त्याचा पुलाचा भाग वाहून गेला. त्याशिवाय अनेक गावांचा सकाळपर्यंत संपर्क पाण्यामुळे तुटलेला होता.
औराद शहाजानीमध्ये ७ जून रोजीही असाच पाऊस झाला होता. त्याची १०९ मिलिमीटर नोंद झाली होती. यानंतर पुन्हा एक महिन्यात दुसऱ्यांदा पाऊस सोमवारी रात्री झाला असून, त्याची ११६ मिलिमीटर नोंद झाली आहे. औराद शहाजानी परिसरात झालेल्या या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जोराच्या पावसामुळे औराद-तगरखेडा पुलाची एक बाजू वाहून गेल्याने मंगळवारी सकाळपर्यंत वाहतूक बंद होती. तर या भागातील अनेक ओढ्याना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
माती वाहून गेल्याने शेतीचे नुकसान...
औराद शहाजानी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले असून, काही शेतातील माती वाहून गेली आहे. आतापर्यंत या भागांमध्ये ४४५ मिलिमीटर पाऊस पडल्याची औराद शहाजनी हवामान केंद्रावर नोंद झाल्याचे मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, जून आणि जुलै अशा दोन महिन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून, नुकसान झाले आहे.