मुख्यमंत्री शिवसैनिकांचा सन्मान सांभाळणारे नेते; लातूर शिवसेनेतील सर्वजण त्यांच्यासोबत येतील
By हणमंत गायकवाड | Published: August 19, 2022 05:32 PM2022-08-19T17:32:30+5:302022-08-19T17:32:52+5:30
लातूर जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक शिंदे गटात येतील; जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांचा विश्वास
लातूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते नसून कार्यकर्ते आहेत. शिवसैनिकांचा मान-सन्मान सांभाळणारे आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वच शिवसैनिक शिंदे गटात येतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
ॲड. बळवंत जाधव म्हणाले, लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक प्रामाणिक आहे. परंतु, मॅनेज राजकारणामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढलेली नाही. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा या मतदारसंघामध्ये शिवसेना ताकदवान आहे. आता यापुढील काळात शिवसेना शिंदे गटाकडून मॅनेज राजकारणाला थारा राहणार नाही. आमची युती भाजपासोबत असून, ही युती नैसर्गिक आहे. आम्ही लातूर ग्रामीणमधून ताकदीने लढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात शिवसेनेचे सर्वच सैनिक आमच्या गटात येतील.
राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी ज्या-ज्या वेळी एखाद्या पक्षासोबत आघाडी करतो त्यावेळी मित्र पक्ष संपतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळेच शिवसेना संपली, असा आरोपही ॲड. बळवंत जाधव यांनी केला. भाजप वगळून अन्य पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळविण्याचा शिवसेनेचा विचार कधीच नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यासोबत शिवसैनिक राजकारण करूच शकत नाहीत, असेही ॲड. जाधव म्हणाले.
भाजपसोबतची युती नैसर्गिक...
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ही अनैसर्गिक युती होती. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांच्यासोबत काम कसे करायचे हा प्रश्न आमच्या मनात होता. नेमका हाच मुद्दा आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी हेरला आणि शिवसेनेला वाचविण्यासाठी आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत नैसर्गिक युती केली. त्यामुळे शिंदे गट शिवसेना आगामी काळात लातूर जिल्ह्यात ताकदीने लढेल. त्यात यश मिळवेल, असा विश्वासही ॲड. बळवंत जाधव यांनी व्यक्त केला.