मद्यपानासाठी थांबविली दीड तास बस; वैतागलेल्या प्रवाशांनी वाहकाला आणले उचलून
By संदीप शिंदे | Published: February 2, 2023 08:08 PM2023-02-02T20:08:26+5:302023-02-02T20:09:53+5:30
घडलेला प्रकार कळल्यानंतर वाहकाला निलंबित केल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.
लातूर : तिकिटे फाडून थकलेल्या एका वाहकाला सकाळी सकाळीच मद्यपानाची आठवण झाली. लातूरच्या बसस्थानकातून निघालेली कळंब आगाराची बस गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता काटगावमध्ये पोहोचली अन् वाहक महाशय मद्यालयाच्या शोधात गेले. जवळपास दीड तास परतले नाहीत. त्यामुळे चिंतित चालक आणि प्रवाशांनी शोध घेतला अन् वाहकाला अखेर एसटीत बसविले. घडलेला प्रकार कळल्यानंतर वाहकाला निलंबित केल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.
लातूर बसस्थानकातून कळंब आगाराची बस (क्र. एमएच ११ बीएल ९३४) प्रवाशांना घेऊन कळंबकडे गुरुवारी सकाळी रवाना झाली. सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लातूर तालुक्यातील काटगाव येथे ती पोहोचली. यावेळी वाहकाला मद्याची तलप झाली. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यास चालकाला सांगितले. त्यानंतर त्याने गावात जिथे दारू मिळते त्या ठिकाणचा शोध घेऊन तिथेच पित बसला. तब्बल दीड तास झाला तरी परत आला नाही. प्रवाशांनी त्याचा शोध घेत धरून एसटीकडे आणले. दरम्यान, चालकाने ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. लातूरचे बसस्थानक प्रमुख हनुमंत चपटे यांनी कळंब डेपोच्या प्रमुखांशी संपर्क साधला. तोपर्यंत गाडी पुढे शिराढोणपर्यंत पोहोचली. कळंब डेपोचे प्रमुख मुकेश कोमटवाड यांनी संबंधित वाहकाच्या आरोग्य तपासणीचे निर्देश दिले. त्यानुसार वाहकाने मद्यसेवन केल्याचे निदर्शनास आल्याने त्यास निलंबित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उस्मानाबादचे विभागीय वाहतूक नियंत्रक दिवटे यांनी सांगितले.
३८ प्रवासी बसले ताटकळत...
मद्यप्राशन करण्यासाठी वाहक गेल्यामुळे या बसमधील ३८ प्रवाशांना दीड तास ताटकळत बसावे लागले. काही प्रवासी आणि काटगाव येथील नागरिकांनी संबंधित वाहकाला दारू पित बसलेल्या ठिकाणावरून अक्षरश: पकडून आणले. त्यानंतर बस कळंबकडे रवाना झाली. वाटेत शिराढोण येथे कळंब आगाराचे प्रमुख मुकेश कोमटवाड यांनी येऊन संबंधित वाहकाची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वाहकाला निलंबित केले, असे विभागीय वाहतूक नियंत्रक दिवटे यांनी सांगितले.