जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे
By संदीप शिंदे | Published: March 7, 2024 06:47 PM2024-03-07T18:47:53+5:302024-03-07T18:52:11+5:30
राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही.
औसा (जि. लातूर) : देशात व राज्यात सत्तेचा दुरुपयोग केला जात असून, केंद्र शासनाची तर एकाधिकारशाही सुरु आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व घटकांना भोगावे लागत आहेत. या एकाधिकारशाहीला सत्तेवरुन हटवावे लागणार आहे. त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो असून, या एकाधिकारशाहीचा तुम्हालाच हिशेब करावा लागेल, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे गुरुवारी केले.
औसा शहरात आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर खा. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, खा. ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे, आ. कल्याण पाटील, आ. कैलास पाटील, माजी आ. दिनकर माने, संतोष सोमवंशी, जयश्री उटगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अमर खानापुरे, शेषेराव पाटील आदींची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही माझे कुटूंब आहात म्हणून मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही. मी हे केले, मी ते केले असे म्हंटले नाही. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे त्यावेळी तुमचे सरकार होते, जनता जनार्दनाचे सरकार होते. तुम्हाला विकसित देशाची गॅरंटी देणारे तुमची गॅरंटी घेतील का. घेतली तर निवडणूकीपूरती घेतील. २०४७ चे स्वप्न ते दाखवत आहेत. तोपर्यंत आपण राहाणार आहोत का? कोण जाणे, आजचे काय? शेतकरी हैराण आहेत, त्याची राज्य व केंद्र सरकारला काहीच चिंता नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
औशाचे दोनवेळा शिवसेनेकडे प्रतिनिधीत्व...
धाराशिवचा खासदार आणि औशाचा आमदार आपलाच असेल. गत निवडणूकीमध्ये त्यांनी गयावया केल्याने औशाची जागा सोडली होती. आगामी निवडणूकीत असे होणार नाही. औसा मतदारसंघातून दोनवेळा दिनकर माने निवडून आले आहेत. लोकसभा आणि विधानसभेत आपले उमेदवार निवडून येतील, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेचे दोन तुकडे करणाऱ्यांना धडा शिकवा...
धाराशिवची जागा आपण जिंकूच, तसेच औसा विधानसभेवरही शिवसेनेचा झेंडा फडकेल. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे सांगत खा. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे यांचीही यावेळी भाषणे झाली.