दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात १२५ कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 03:57 PM2021-01-08T15:57:56+5:302021-01-08T15:59:23+5:30
relief to farmers खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.
लातूर : गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते. सदरील मदत १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.
खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. जवळपास अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२८ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीचे १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय मदतीचे वाटप केले जाणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...
पहिल्या टप्प्यात अनुदान वितरीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर ५९४, औसा ३५ हजार ३११, रेणापूर ६११, निलंगा ४० हजार ७३१, शिरूर अनंतपाळ ११ हजार ९३२, देवणी १४ हजार ७०४, उदगीर २३ हजार ८१०, जळकोट १२ हजार १०५, अहमदपूर २७ हजार ३७३ तर चाकूर तालुक्यातील २१ हजार ५४६ अशा एकूण १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्यामध्ये ३ लाख ८५ हजार शेतकरी असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.