लातुरात जीर्ण, धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ
By हणमंत गायकवाड | Published: July 31, 2023 04:31 PM2023-07-31T16:31:30+5:302023-07-31T16:31:55+5:30
महानगरपालिकेने दिल्या होत्या नोटिसा: आझाद चाैकातून सुरुवात
लातूर : पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना होऊ शकते. ही बाब गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेने नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार, काही मालमत्ताधारकांनी आपल्या जुन्या जीर्ण इमारती पाडण्यास प्रारंभ केला आहे. आझाद चौकातील एक जीर्ण इमारत पाडण्यास रविवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला.
गाव भागातील डीझोनअंतर्गत एकूण ८० ते ८५ जुन्या जीर्ण झालेल्या इमारती मालमत्ताधारकांना महानगरपालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. यातील काही अति जीर्ण व धोकादायक इमारतीधारकांना तीन दिवसांत इमारत पाडण्यासंदर्भात सूचित केले होते. संबंधितांनी इमारती पडल्या नाहीत, तर मनपाकडून त्या पाडण्यात येतील, तसेच त्या खर्चाचा बोजा संबंधित मालमत्तेवर लावण्यात येईल, असे या नोटीसमध्ये सूचित करण्यात आले होते. संबंधित इमारतीवर नोटीसही डकविण्यात आल्या होत्या. त्यानंतर, संबंधितांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली होती. त्यानुसार, आझाद चौकात एक जीर्ण इमारत पाडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
दुसऱ्यांदा नोटिसा पाठविल्यानंतर आयुक्तांनी घेतला आढावा
१६ जुलै रोजी पहिली नोटीस संबंधितांना पाठविण्यात आल्या. २४ जुलै रोजी दुसऱ्यांदा नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर, मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. दरम्यान, आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे डी झोनचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी संबंधित मालकांना पुन्हा एकदा इमारती उतरून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, इमारत मालक गोपाळ हरीकिशन अग्रवाल यांनी रविवारी स्वतः इमारत पडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या परिसरातील धोका कमी होणार आहे,अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी अधिकारी बंडू किसवे यांनी दिली.