‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर
By राजकुमार जोंधळे | Published: May 20, 2024 07:03 PM2024-05-20T19:03:48+5:302024-05-20T19:04:11+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे.
लातूर : गत सहा महिन्यात साेन्या-चांदीच्या दरात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, आता साेने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. साेमवारी चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर पाेहचली असून, साेने २४ कॅरेट प्रतिताेळा ७५ हजार ६०० रुपयांवर पाेहचले आहे. दिवाळीपासून चांदी २० हजारांनी वधारली तर साेने १५ हजारांनी वधारले आहे. गत पाच वर्षात चांदीने प्रतिकिलाेला तब्बल ५५ हजारांचा तर साेन्याने दुप्पट परतावा दिला आहे. यातून साेन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची मात्र चांदी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे. दिवाळीमध्ये साेने प्रतिताेळा ६० हजारांवर हाेते. तर चांदी ७० हजारांवर हाेती. युद्धाचा परिणामही गत वर्षभरात साेन्या-चांदीच्या उलाढालीवर, दरवाढीवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अलिकडे साेन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. साेन्यात १५ हजार तर चांदीमध्ये २० हजारांचा वाढ झाली आहे.
साेने-चांदी वधारली; पंधरा हजारांची वाढ...
२०१९ मध्ये साेने प्रतिताेळा ४२ हजारांवर हाेते ते २०२४ मध्ये ७५ हजारांवर गेले आहे. २०१९ मध्ये चांदी प्रतिकिलाे ३५ हजारांवर हाेती. आता २०२४ मध्ये ती ९२ हजारांवर पाेहचली आहे. दिवाळीनंतर साेने प्रति ताेळा १५ हजारांनी वधारले आहे. चांदी १७ हजारांनी वधारली आहे.
तरीही खरेदीचा उत्साह...
लातूरच्या सराफा बाजारात साेन्या-चांदीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, साेने ७५ हजारांवर तर चांदी ९२ हजारांवर गेली आहे. मात्र, साेन्या-चांदीत गुंतवणूक म्हणून अनेक जण खरेदीला प्राधान्य देत आहेत. दिवाळीनंतर साेन्याने १५ हजारांची तर चांदीने १७ हजारांची उसळी घेतली आहे. - महेश शिंदे बाकलीकर, सराफा
पाच वर्षात चांदी ५० हजारांनी वाढली...
वर्ष साेने चांदी
२०१९ ३५,००० ४२,०००
२०२० ४८,६०० ५८,०००
२०२१ ४९,१३० ६०,०००
२०२२ ५१,६८० ६२,०००
२०२३ ६१,२०० ७४,०००
२०२४ ७५,००० ९२,०००