टोल फ्री क्रमांक '१०९८' वर तक्रार; लातूरात चार महिन्यांत आठ बालविवाह रोखले
By हणमंत गायकवाड | Published: January 1, 2024 06:23 PM2024-01-01T18:23:26+5:302024-01-01T18:23:48+5:30
महिला व बालकल्याण विभागाकडे २५ तक्रारी
लातूर : महिला व बालकल्याण विभागाने लहान मुलांच्या अनुषंगाने तक्रार नोंदविण्यासाठी १०९८ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या टोल फ्रीवर सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात आठ तक्रारी बालविवाहाच्या अनुषंगाने होत्या. त्यावर तत्काळ दखल घेऊन होणारे बालविवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे.
लहान मुलांच्या अनुषंगाने मिसिंग, शारीरिक मारहाण, बालविवाह, समुपदेशन, बालकामगार व अन्य कारणांमुळे बालकांच्या समस्यांबाबत सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत १०९८ या टोल फ्री क्रमांकावर एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आठ तक्रारी या बालविवाह होत असल्याच्या होत्या. त्या तात्काळ कार्यवाही करून बालविवाह रोखण्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे. काल संपलेल्या डिसेंबर महिन्यात एकूण चार बालविवाह महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने समुपदेशन करून रोखले आहेत.
टोल फ्रीवर आलेल्या तक्रारींचे स्वरूप...
टोल फ्रीवर आलेल्या तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे आहे. काही तक्रारी तर आई-वडील मोबाइल घेऊन देत नाहीत, अशा स्वरूपाचीही तक्रार आहे. आठवी, नववीच्या मुलांच्या तक्रारी या टोल फ्रीवर असल्याचे महिला व बालकल्याण विभागातून सांगण्यात आले. वास्तविक पाहता हरवलेले, बालकामगार, भिक्षेकरी व अन्य कारणांच्या अनुषंगाने लहान मुलांचा छळ होत असेल तर टोल फ्रीवर तक्रार करता येते. मात्र, काही फेक तक्रारी या टोल फ्रीवर येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली. १०९८ हा टोल फ्री क्रमांक असून त्यावर खरंच त्रास होत असेल तर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.
टोल फ्रीवर संपर्क साधा...
बालकामगार ठेवले असतील, बालकांचे हक्क नाकारले जात असतील, तर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाल संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क साधता येईल. १०९८ असा नंबर आहे.
- देवदत्त गिरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, लातूर
चार महिन्यांत टोल फ्रीवर अशा आल्या तक्रारी...
हरवलेले : ६
शारीरिक मारहाण :०३
बालविवाह : ०८
समुपदेशन : ०२
बालकामगार : ०२
इतर : ०४
एकूण : २५