खरीप पिके सुकू लागल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:16+5:302021-08-12T04:24:16+5:30

तालुक्यातील प्रमुख पीक सोयाबीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने आणि बाजारात चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीनवर भर ...

Concerns were raised as kharif crops began to dry up | खरीप पिके सुकू लागल्याने चिंता वाढली

खरीप पिके सुकू लागल्याने चिंता वाढली

Next

तालुक्यातील प्रमुख पीक सोयाबीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने आणि बाजारात चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीनवर भर दिला. त्यापाठोपाठ उडीद, मूग, ज्वारी, कापसाची लागवड झाली. जळकोट हा तालुका डोंगरी असल्याने हलक्‍या प्रतीची जमीन अधिक आहे. त्यामुळे सतत पावसाची गरज भासते.

तालुक्यात एकूण ३५ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५ हजार हेक्‍टरवर पेरा झाला आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. पेरणीनंतर सतत पाऊस झाल्याने खरिपातील पिके बहरली. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. सततच्या पावसामुळे तलावात जलसाठा झाला होता. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

पाण्याअभावी पीक कोमेजू लागले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्याने त्यांचे वरुणराजाकडे लक्ष लागले आहे. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके वाळून जाण्याची भीती आहे.

गतवर्षीच्या पीकविम्याचे वाटप करावे...

कोरोनामुळे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत होते. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या पीकविम्याचे तत्काळ वाटप करावे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे मन्मथप्पा किडे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, खादरभाई लाटवाले, नगरसेवक रमाकांत रायेवार, शिवानंद देशमुख, गोपाळकृष्ण गव्हाळे, ॲड. तात्या पाटील, बिरादार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, आयुब शेख, गोविंद केंद्रे आदींनी केली आहे.

Web Title: Concerns were raised as kharif crops began to dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.