लातुरात नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत वीजजोडणी; अनधिकृत वापर केल्यास होणार कारवाई
By हणमंत गायकवाड | Published: September 23, 2022 06:45 PM2022-09-23T18:45:22+5:302022-09-23T18:46:31+5:30
नवरात्रोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वीज जोडणी तसेच विजेबाबत तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.
लातूर : नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत जोडणी दिली जाणार आहे. उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व सुरक्षेसाठी महावितरणने सवलतीच्या दरात वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज ग्राहकांप्रमाणे पहिल्या शंभर युनिटसाठी ४ रु. ७१ पैसे प्रतियुनिट दर आकारला जाणार आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रु. ६९ पैसे प्रतियुनिट, ३०१ ते ५०० युनिटसाठी ११ रु. ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रु.२१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
अनधिकृत वापर केल्यास कारवाई
मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीतील संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, मंडप व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था, संच मांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
मंडळांसाठी महावितरणची हेल्पलाईन
नवरात्रोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वीज जोडणी तसेच विजेबाबत तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. २४ तास ही सेवा उपलब्ध असेल. १९१२ किंवा १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.