ऑनलाइन हजेरीची अट; अधिकारी-कर्मचारी संपावर, ४२४ गावांतील रोहयोची कामे ठप्प!

By संदीप शिंदे | Published: February 2, 2023 08:19 PM2023-02-02T20:19:49+5:302023-02-02T20:21:24+5:30

लातूर जिल्ह्यातील ७६६ ग्रामरोजगार सेवक संपात सहभागी

Condition of Online Attendance; Gram rojgar sevak on strike, mgnrega works in 424 villages stopped! | ऑनलाइन हजेरीची अट; अधिकारी-कर्मचारी संपावर, ४२४ गावांतील रोहयोची कामे ठप्प!

ऑनलाइन हजेरीची अट; अधिकारी-कर्मचारी संपावर, ४२४ गावांतील रोहयोची कामे ठप्प!

googlenewsNext

- संदीप शिंदे
लातूर :
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणाहून दोन वेळा थेट मॉनिटरिंग सिस्टीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाइन हजेरी देण्याची अट १ जानेवारीपासून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रणालीला विरोध करण्यासाठी रोहयोचे कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, डाटा इन्ट्री ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक संपावर गेले आहेत. परिणामी, २५ जानेवारीपासून जिल्ह्यातील ४२४ गावांतील कामे ठप्प आहेत. त्यामुळे संप कधी मिटणार याकडे मजुरांचे डोळे लागले आहे.

मे २०२२ मध्ये २० पेक्षा जास्त मजूर असलेल्या ठिकाणी नॅशनल मोबाइल मॉनिटरिंग सिस्टीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळेस रोहयोच्या कामावर हजर मजुरांचा फोटो ॲपवर अपलोड करावा लागत होता. मात्र, १ जानेवारीपासून सर्वच सार्वजनिक कामावर हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, या नियमासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ४२६ गावांतील रोहयाेची कामे ठप्प आहेत.

जिल्ह्यात ३ लाख ३५ हजार ४०४ कुटुंबातील ७ लाख २८ हजार ५७० मजुरांची रोहयाेकडे नोंदणी आहे. २३ जानेवारीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ४२४ गावांमध्ये १६९४ कामे सुरू होती. यामध्ये १३ हजार ६३७ मजूर कामावर होते. मात्र, संपामुळे रोहयोच्या मजुरांना कामे कधी सुरु होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

वैयक्तिक, सार्वजनिक कामांचा समावेश...
रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक कामामध्ये विहीर, शौचालय, शोषखड्डे, पशुधन गोठा, नाडेप कंपोस्ट तर सार्वजनिक कामांमध्ये रस्ते, वृक्षलागवड, रोपवाटिका आदी कामांचा समावेश होतो. दरम्यान, मे २०२२ मध्ये २० पेक्षा मजूर असलेल्या कामांवरच ऑनलाइन हजेरीची अट होती. मात्र, १ जानेवारीपासून सार्वजनिक सर्वच कामांसाठी ऑनलाइन हजेरी बंधनकारक केली आहे. तर वैयक्तिकच्या २० पेक्षा अधिक मजूर असलेल्या ठिकाणीच ऑनलाइन हजेरी आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच...
राेहयो योजनेची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतिबंधामध्ये समायोजन करावे, सहायक कार्यक्रमाधिकारी, तांत्रिक सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक यांना पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच असून, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रोहयोत नोंदणीकृत कुटुंब, मजूर, ग्रामरोजगार सेवक...
तालुका             कुटुंब             मजूर             रोजगार सेवक
अहमदपूर ३६४८८             ८७६१५             ९४
रेणापूर             २५४५२ ५४०५३             ६५
औसा             ५१३२१            १०२८९३             १०८
निलंगा            ५२९३६             १११९९०             ११६
देवणी             १७९२६ ४३०८१             ४५
जळकोट             १७४८० ४१४१२             ४३
शिरूर अंन. १६२२५ ३५८६५             ४०
लातूर             ४३१७९ ८८९१२             १०६
चाकूर             ३३९२५ ६६५५७             ६५
उदगीर             ४०४८२ ९६१९२             ८४
एकूण             ३३५४०४ ७२८५७०             ७६६

Web Title: Condition of Online Attendance; Gram rojgar sevak on strike, mgnrega works in 424 villages stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.