देवणी नगरपंचायतीच्या प्रारुप मतदार यादीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:50+5:302021-02-24T04:21:50+5:30
देवणी : देवणी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. त्या पाहताच बहुतांश नागरिकांना धक्काच ...
देवणी : देवणी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. त्या पाहताच बहुतांश नागरिकांना धक्काच बसला आहे. नागरिकांचा रहिवास एका ठिकाणी आणि प्रभाग दुसरा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे मतदारांतून नाराजी व्यक्त होत आहे.
देवणी नगरपंचायतीची लवकरच निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय प्रारुप मतदारयाद्यात तयार करण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्या जाहीर करण्यात येऊन त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. आक्षेप सादर करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे येथील कार्यालयात सोमवारी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
सदरील प्रारुप मतदारयाद्यांत काही प्रभाग लहान दाखविण्यात आले आहे तर काही प्रभाग मोठे करण्यात आले आहेत. काही मतदार एका प्रभागात राहत असले तरी त्यांचे मतदारयादीतील नाव दुस-या प्रभागात दाखविण्यात आले आहे. आगामी निवडणूक ही इच्छुक उमेदवारांना सोईची व्हावी म्हणून काही जणांनी निवडणुकीपूर्वीच मतदारांची पळवापळवी केली की काय? असा सवाल व्यक्त होत आहे.
आक्षेप नोंदणीच्या शेवटच्या दिवशी काही मतदारांनी नगर पंचायतीच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे सोमवारी कार्यालयात गर्दी झाली होती. मतदारांबरोबरच राजकीय कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू होती.
६९७ जणांनी नोंदविला आक्षेप...
आक्षेप नोंदणीसाठी नगरपंचायत कार्यालयात गर्दी झाली होती. शहरातील एकूण १७ प्रभागातील ६९६ मतदारांनी लेखी अर्जाने आपले आक्षेप नोंदविले आहेत. मतदारांच्या आक्षेपाबरोबरच काही राजकीय पक्ष व संघटनांनीही आक्षेप नोंदविले आहेत. आम्ही ज्या प्रभागात राहतो, तेथील मतदारयादीत आपले नाव ठेवण्याची मागणी केली. तसेच मयत आणि विवाह झालेल्यांची नावेही प्रारुप मतदारयादीत दिसून येत असल्याचे काही जणांनी सांगितले.
चौकशी करण्यात येईल...
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले, प्रारुप मतदारयादीत काही जणांचे प्रभाग बदलले असल्यास त्यांनी वेळेत दुरुस्तीचा अर्ज दिले असल्यास अर्जदारांच्या घरोघरी जाऊन खातरजमा करुन चौकशी करण्यात येईल. त्यासंबंधीचा लेखी अहवाल देण्यासाठी नगरपंचायतीने कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात येईल.