लातूर लोकसभेसाठी काँग्रेस सक्षम उमेदवार देणार - संग्राम थोपटे
By आशपाक पठाण | Published: August 12, 2023 04:45 PM2023-08-12T16:45:44+5:302023-08-12T16:49:23+5:30
लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेस घडविण्यात लातूरचा मोठा वाटा आहे.
लातूर : राज्यात-देशात सत्ताधारी पक्षाला जनता कंटाळली आहे. मागील लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लातूर मतदारसंघात काँग्रेसला माेठे यश मिळाले आहे. त्यामुळे विजय अवघड नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सक्षम उमेदवार देणार आहे, त्यासाठीच आढावा घेतला जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रपरिषदेत शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेस घडविण्यात लातूरचा मोठा वाटा आहे. मागील निवडणुकीत २ लाख ८९ हजार १११ मताच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. सध्या वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. आम्ही इंडियासोबत असल्याने विजय अवघड नाही, असेही आ. थोपटे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने लातूर लोकसभेचा निरीक्षक म्हणून मला जबाबदारी दिल्यानंतर मी बैठक लावली आहे. या बैठकीचा आढावा वरिष्ठांना सादर करणार असल्याने थोपटे म्हणाले.
पत्रपरिषदेस माजी मंत्री आ. अमित देशमुख, सहनिरीक्षक जितेंद्र देहाडे, प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, अशोकराव पाटील निलंगेकर, माजी आ. त्र्यंबक भिसे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दिपक सूळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांची उपस्थिती होती.
लोकसभा ही देशाची निवडणूक : आ. अमित देशमुख
लोकसभेची निवडणूक ही देशाची असते. प्रत्येक निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी असते. महाराष्ट्रात सहा मतदारसंघ राखीव आहेत. त्यात लातूरचाही समावेश आहे. पक्षीय पातळीवर वरिष्ठ नेत्यांना कुठे ॲडजस्ट करायचे, ही ठरविले जाते. तत्कालीन निवडणुकीत मातंग समाजाला स्थान मिळाले नसल्याने जयवंतराव आवळे यांना लातूरला उमेदवारी देण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांनी त्यांना निवडूनही आणले. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यावेळी पक्ष सक्षम उमेदवार देईल, असे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सांगितले.