काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 07:43 PM2024-10-29T19:43:37+5:302024-10-29T19:45:01+5:30
लातूर शहर विधानसभेचे चित्र स्पष्ट; पुनर्रचनेनंतरची चौथी निवडणूक चुरशीची
लातूर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील - चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील - चाकूरकर यांना उमेदवारी देत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे.
पुनर्रचनेनंतरची ही चौथी निवडणूक आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील - चाकूरकर आणि दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे केंद्रात व राज्यात दीर्घकाळ सत्तेत होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील - निलंगेकर, चाकूरकर व देशमुख ही जिल्ह्यातील काँग्रेसची दिग्गज तीन घराणी आहेत. केंद्रात चाकूरकर आणि राज्यात डॉ. निलंगेकर व देशमुख असे समीकरण राहिले. परंतु, २०१४नंतर राजकारणाची दिशा बदलत गेली. काही महिन्यांपूर्वी डॉ. अर्चना चाकूरकर भाजपामध्ये दाखल झाल्या. तेव्हापासूनच शहर विधानसभा मतदारसंघात त्या उमेदवार असणार याची चर्चा जोर धरू लागली होती. दरम्यान, सोमवारी भाजपाकडून डॉ. अर्चना यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तूर्त तरी सामना दुरंगी दिसत असून, वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हेही मैदानात आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर राजकीय समीकरणे अधिक ठळकपणे समोर येतील.
काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे, नेटवर्क तगडे आहे. मागील तीनही निवडणुकांमध्ये माजी मंत्री आ. देशमुख मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचवेळी २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाने ७० हजारांवर मते घेत मतांचा ३३ ते ३४ टक्के वाटा मिळविला होता. त्यामुळे भाजपाची म्हणून मते पक्की आहेत, तर काँग्रेसला तिन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे ६४.९१ टक्के, ५८.८२ व ५२.४८ टक्के मते मिळाली होती. पुनर्रचनेनंतरच्या चौथ्या निवडणुकीत मात्र भाजपाने डॉ. अर्चना यांना उमेदवारी देऊन निवडणूक चर्चेत आणली आहे.