वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; १००० ॲटोचालकांना गणवेश भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:25 PM2023-04-15T23:25:50+5:302023-04-15T23:26:20+5:30
कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
लातूर : रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करण्याचा विचार असून, त्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखा, विविध सामाजिक संस्था, व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून तब्बल एक हजार ऑटाेचालकांना माेफत गणवेश वाटपाचा विधायक उपक्रम लातूर पाेलिसांनी हाती घेतला आहे. याचा प्रारंभ शनिवारी गांधी चाैक ठाण्यात एका कार्यक्रमात करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये पाेलिसांनी २०० ऑटाेचालकांना गणवेश भेट दिला. कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
यावेळी अजित भुतडा, मनीष बाेरा, गाैरव ब्रिजवासी, अग्रवाल, जितू मुंदडा, महेश बिलगुडी यांचा सत्कार करण्यात आला. लातुरातील ऑटाे रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करावी का? असा प्रश्न पहिल्यांदा पाेलिसांसमाेर आला. मात्र, आता तातडीने प्रत्येक ऑटाेचालकांना गणवेश घेणे शक्य हाेणार नाही. यासाठी पाेलिसांनीच विविध सामाजिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधत आवाहन केले. या आवाहनाला माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या सहभागातून तब्बल १ हजारांवर मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेतला. पहिला टप्पा म्हणून गांधी चाैक येथे शनिवारी कार्यक्रमात २०० रिक्षाचालकांना गणवेशाची भेट दिली.
या चालकांना माेफत गणवेश...
लातुरातील ऑटाे रिक्षाचालकांना आता गणवेश सक्ती केली जात आहे. त्यासाठी लातूर पाेलिसांकडून ऑटाेचालकांना गणवेश वाटप केले जात आहेत. यासाठी ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे, अशा एक हजार परवानाधारक रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे.
संस्था, पाेलिसांनी घेतला पुढाकार...
लातूर शहर वाहतूक पोलिस शाखेने खटले दाखल करून वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून रिक्षाचालकांना गणवेश वाटप करण्याचा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या सहकार्यातून तब्बल एक हजार रिक्षाचालकांना मोफत गणवेशाची भेट दिली जात आहे.