बांध फोडल्यावरुन दोन गटात वाद पेटला; शेतकऱ्याचा दगडाने ठेचून केला खून
By राजकुमार जोंधळे | Published: May 17, 2024 07:18 PM2024-05-17T19:18:31+5:302024-05-17T19:24:01+5:30
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
औसा (जि. लातूर) : शेतातील बांध फाेडून माती घेवून जाण्याच्या कारणावरुन कत्ती, राॅड आणि दगडाने ठेचून एका शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना शिंदाळा (ता. औसा) येथे गुरुवारी रात्री घडली. यात सहा जखमी झाले असून, दाेघांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, सिंदाळा, सिंदाळावाडी शिवारात दहा एकर विलास माेरे यांच्या वडिलांच्या नावे असून, याच जमीनीलगत चंद्रसेन मुळे याचीही शेती आहे. ते दोन दिवसांपासून शेतातील माती जेसीबीच्या साह्याने काढून ट्रॅक्टरने घेवून जात होते. दरम्यान, गुरुवारी रात्री यातून माेरे आणि मुळे यांच्यात वाद झाला. सामाईक बांध फोडून माती नेण्यावरुन विलास व्यंकट मोरे यांच्यासह कुटुंबातील काहींनी त्यांना जाब विचारला. यावेळी चंद्रसेन मुळे, आण्णाराव मुळे, शेषेराव मुळे, कमलाकर मुळे, परमेश्वर मुळे, संतोष मुळे, अंगद भोसले यांनी कत्ती, लोखंडी रॉड, काठी, दगडाने जबर मारहाण केली.
या मारहाणीत विलास व्यंकट मोरे यांच्या डोक्यात कत्ती, रॉडचा मार लागला. त्यानंतर दगडाने ठेचल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शुक्रवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास औसा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तर बालाजी व्यंकट मोरे, गोपाळ व्यंकट मोरे, अनंत गोपाळ मोरे यांच्यासह आण्णाराव मुळे हे जखमी आहेत. त्यांनाही पुढील उपचारासाठी औसा येथून लातूरला हलविण्यात आले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात राेहित विलास माेरे यांच्या तक्रारीवरुन शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी तिघांना अटक केल्याचे सपोनि. राहुलकुमार भोळ यांनी सांगितले.