जॅमर लावण्यावरून वाद; दुचाकी चालकाच्या मारहाणीत टोइंग कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर
By राजकुमार जोंधळे | Published: September 8, 2023 02:02 PM2023-09-08T14:02:56+5:302023-09-08T14:03:51+5:30
लातूरतील घटना : या प्रकरणी तिघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे
लातूर : टोइंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहर महापालिकेच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला काम दिले आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जॅमर लावणे, दंड वसूल करणे आदी कामे या एजन्सीकडून केली जातात. गुरुवारी सायंकाळी सुभाष चौकात एका व्यक्तीने नो पार्किंग झोनमध्ये दुचाकी लावली. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने त्यांच्या दुचाकीला जॅमर लावले. त्यावेळी त्या व्यक्तीने आणि इतर दोघा महिलांनी कर्मचारी बालिका कांबळे यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना उपचारासाठी लातूरतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबनुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरात वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे...
सध्या सणासुदीचे दिवस असून, लातूर शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. या स्थितीमध्ये वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दंडात्मक कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.