घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद; आक्रमक शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन
By हरी मोकाशे | Published: July 1, 2023 05:09 PM2023-07-01T17:09:00+5:302023-07-01T17:09:14+5:30
लातूरला पाणी देण्यावरुन शेतकरी आक्रमक
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळसह इतर ४० गावांची तहान भागविणाऱ्या तसेच शेतीत सिंचनाच्या माध्यमातून समृध्दी आणणाऱ्या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणीलातूरच्या वाढीव वस्त्यांसाठी नेण्यात येत आहे. त्यास विरोध करीत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीच्या वतीने सहा दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी आरीमोड येथील जलकुंभावर चढून आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी विविध गावांतील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील ४० गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेतीसाठी वरदान ठरलेल्या शिवपूर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरला नेण्याचा घाट घालण्यात आला. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची पाणी उपसा, जलवाहिनी योजना मंजूर करण्यात आली आहे. या जलवाहिनीसाठी सध्या खोदकाम करण्यात येत आहे. १२ इंचाच्या जलवाहिनेद्वारे लातूरच्या वाढीव वस्तीस पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.
तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले असून, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीने लातूरला पाणी घेऊन जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी समितीच्या वतीने दररोज वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. मोर्चा, रास्तारोको, अन्नत्याग असे सतत आंदोलने सुरु आहेत. शिवाय, नियमितपणे धरणे आंदोलन सुरू आहे. उत्तरोत्तर आंदोलक आक्रमक होत असून, कोणत्याही परिस्थितीत घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरला नेऊ देणार नाही, असा ठाम निर्धार केला आहे.
शनिवारी आरीमोड येथील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, सुरज चव्हाण, सुधीर लखनगावे, सुरेंद्र धुमाळ, पंकज शेळके, लक्ष्मण बोधले, गंगाधर चव्हाण, अनिल देवंगरे, अपरिजित मरगणे, रामकिशन गड्डिमे, महेश देशमुख, बबन होनमाने, ओम जगताप, विठ्ठलराव पाटील, संजय बिराजदार यांच्यासह नागेवाडी, कारेवाडी, दगडवाडी, बोळेगाव, लक्कड जवळगा आदी गावांतील शेकडो नागरिक उपस्थित होते.
प्रशासनावर संताप अन् जोरदार घोषणा...
घरणी प्रकल्पातील पाणी लातूरच्या वाढीव वस्तीस देण्यात येऊ नये अशी मागणी करीत आरी मोड येथील जलकुंभावर चढून नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात तालुक्यातील नागेवाडी, कारेवाडी, दगडवाडी, बोळेगाव, जोगाळा, लक्कड जवळगा, आरी, शिवपूर, धामणगाव येथील ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.