उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 02:23 PM2020-04-25T14:23:36+5:302020-04-25T14:27:27+5:30
उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी
लातूर : उदगीर शहरात शनिवारी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, मात्र, परराज्यातील आठ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. दरम्यान उदगीरच्या बातमीने चिंता वाढली आहे. उदगीरमध्ये हा पहिलाच रुग्ण आढळला आहे, त्यांचा प्रवास इतिहास काय आहे, तो स्थानिक की बाहेरील याची माहिती घेतली जात आहे.
उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सदरील रुग्ण महिला असून, ती 70 वर्षांची आहे. अन्य आजारांनी त्रस्त असल्याने ती रुग्णालयात आली होती. दरम्यान उदगीरवासीयांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन खबरदारी घेत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर महिलेला बाधा कशी झाली, तिचा प्रवास इतिहास आदी तपासून पाहिला जात आहे, तसेच तिच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन केले जाईल.
दरम्यान, ही महिला गुजरातहून आलेल्या महिलेच्या संपर्कात आली होती की नाही, याचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत, असे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.