कोरोनातही वाढविली ऑनलाईन शिक्षणाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:19+5:302021-09-05T04:24:19+5:30
बालाजी राजाराम समुखराव हे मूळचे चाकूर तालुक्यातील हाडोळी गावचे रहिवासी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असले ...
बालाजी राजाराम समुखराव हे मूळचे चाकूर तालुक्यातील हाडोळी गावचे रहिवासी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असले तरी त्यांच्यात नावीन्यपूर्ण विविध गोष्टी आत्मसात करण्याची जिद्द. शिक्षणात होत असलेले आमूलाग्र बदल स्वीकारण्याची तयारी असलेल्या समुखराव यांनी मराठी विषयात पीएच.डी. मिळविली. तसेच सेट, नेटही उत्तीर्ण आहेत. हासेगावच्या जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देतात. विद्यार्थ्यांमध्ये असलेली इंग्रजीची भीती घालविण्यासाठी त्यांनी हसूया, खेळूया असा उपक्रम राबविला. त्यात दररोज पाच वाक्ये इंग्रजीत द्यायचे. त्याच आधारावर एकमेकांशी इंग्रजीत संवाद साधायचा. डाएटच्या माध्यमातून राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यात प्रथम आला. यातून विद्यार्थ्यांच्या मनात असलेले इंग्रजीचे न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास वाढविण्याचे काम करण्यात आले. शाळेत घेतलेले उपक्रम चित्रीकरण करून पालकांपर्यंत पोहचवायचे पण इतरांना याबाबत माहिती व्हावी म्हणून यूट्यूबवर अपलोड करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आलेले बदल स्वत: स्वीकारत विद्यार्थ्यांनीही आत्मसात कसे करावे, यावर त्यांचा विशेष भर आहे.
कोविड कॅप्टनच्या माध्यमातून ऑफलाईन धडे देण्याचे काम केले जात असून हुशार असलेल्या मुलांच्या घरी सात ते आठ विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या अभ्यासातील समस्या दूर करण्याचे काम केल्याचे समुखराव यांनी सांगितले.
...अन् विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला
कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी अन् शिक्षकांचा फारसा संबंध येत नव्हता. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्याचे बैठकीत ठरले. झूमच्या माध्यमातून शाळा भरली. त्यात सर्व विद्यार्थी एकत्र येऊ लागले. एकमेकांना प्रश्न विचारू लागले. तसेच कवी, कथाकार यांना झूममध्ये सहभागी करून घेत कार्यक्रमही घेण्यात आले. यातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत गेला. मुलांच्या ज्ञानात भर पडल्याने पालकही समाधान व्यक्त करीत आहेत. विद्यार्थी दररोज एकत्र येत असल्याने शाळा सुरू असल्याचा आनंद घेत आहेत.