देवणी तालुक्यातील ५४ पैकी ५० गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:03+5:302021-04-23T04:21:03+5:30
देवणी : तालुक्यातील ५४ पैकी ५० गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत ७१० जण कोरोनाबाधित आढळून आले ...
देवणी : तालुक्यातील ५४ पैकी ५० गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत ७१० जण कोरोनाबाधित आढळून आले असून उपचारानंतर ३५९ जण ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दुस-या टप्प्यात तालुक्याबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, कोरेानाचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यातील मोठी गावेही त्यातून सुटली नाहीत.
ब्रेक द चेनअंतर्गत राज्य शासनाने सध्या संचारबंदी लागू केली असली, तरी रस्त्यावर काही जण अनावश्यक फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दंडात्मक कार्यवाहीवर भर देण्यात आला. तरीही काहीजण फिरत असल्याचे पाहून त्यांची काेविड चाचणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर अनावश्यक फिरणा-यांना पायबंद बसला आहे.
तालुक्यातील अचवला, नागराळ, बोरोळ येथे अचानक बाधितांची संख्या वाढल्याने ही गावे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या. तसेच देवणी शहर, विळेगाव, नेकनाळ येथेही संसर्ग वाढला आहे. याशिवाय जवळगा, वलांडी, सावरगाव येथेही कोरोनाबाधित वाढले आहेत.
८५ टक्के नागरिकांच्या चाचण्या...
कंटेनमेंट झोन झालेल्या अचवला गावात ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील गोरगरिबांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गावातील ८५ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. गावातील काही जण शेतात राहण्यास गेले, तेव्हा त्यांना मदत केली. आठवडाभर लोकप्रबोधन केले. त्यामुळे आता गावात नवीन बाधित आढळत नाही.
- नामदेव कारभारी, सरपंच, अचवला
जनजागृतीवर भर...
तालुक्यातील ज्या गावांत बाधित आढळून येत आहेत, तिथे आरोग्य विभागाकडून कोविड चाचणी करण्यात येत आहे. लसीकरणावर भर देण्यात आला आहे. जनजागृती करण्यात येत आहे.
- मनोज राऊत, बीडीओ
कोरोना प्रतिबंधित समिती...
तालुक्यातील प्रत्येक गावात कोविड प्रतिबंधित समिती स्थापन करण्यात आली आहे. ब्रेक द चेनअंतर्गत पोलीस कर्मचारी व अन्य विभागांच्या कर्मचा-यांचे चौकाचौकांत बैठे पथक आहेत. याशिवाय, भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कार्यवाही केली जात आहे.
- सुरेश घोळवे, तहसीलदार
चार गावांनी रोखले...
तालुक्यातील केवळ चार गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला नाही. दीड महिन्यापासून आतापर्यंत एकूण ७१० कोरोनाबाधित आढळले आहेत. उपचारानंतर ३५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३३८ जण उपचार घेत आहेत. तालुक्यात १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देवणीच्या कोविड केअर सेंटरमध्ये ३० जण उपचार घेत आहेत.