CoronaVirus : लातुरात मोफत भाजीपाल्यासाठी नागरिक रस्त्यांवर ! पोलिसांनी पांगवला जमाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 06:17 PM2020-03-31T18:17:50+5:302020-03-31T18:19:08+5:30
गरजूंना मोफत भाजीपाला वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्याने अनेकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी इतरांकडे पाहण्याची वेळ आली आहे़ गरजूंना विविध सामाजिक संस्था, संघटना मदत पोहचिवण्याचे काम आहेत़ शहरातील साळे गल्ली भागात गरजूंना भाजीपाला वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू असताना शेकडो लोकांची गर्दी उसळली़ अखेर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घ्यावी लागली़ गर्दी पांगताच पोलिसांनी आयोजकालाही चांगलीच समज दिली़
प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीही पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे़ गर्दी कमी करण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत़ हे सर्व सुरळीत सुरू असताना लातूर शहरातील साळे गल्ली भागात मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने गरजू लोकांना मोफत भाजीपाला वाटप सुरू केला होता़ ही माहिती परिसरात कळताच लोकांनी मोठी गर्दी केली़ त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला़ इथे ना सोशल डिस्टन्स, ना कुणाच्या आरोग्याची काळजी़ याबाबत काही सजग नागरिकांनी हा प्रकार मनपाचे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांना सांगितला़ भाजी घेण्यासाठी महिलांसह मुलेही रांगेत उभी होती़ शेकडो लोक रस्त्यावर आल्याचे सांगण्यात आल्याने किसवे यांनी तात्काळ विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सदरील माहिती देत पोलिसांना पाचारण केले़ घटनास्थळी पोलिस दाखल होताच नागरिकांनी पळ काढला़ काही वेळातच गर्दी पांगविण्यात आली़ तद्नंतर पोलिसांनी संयोजकाला समज दिली़
मदत करायची तर घरपोच करा़़़
लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाºया अनेक मजुरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ अशाच लोकांचा शोध घेऊन सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था घरपोच धान्य पुरवठा करीत आहेत़ अशा लोकांना महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन सहकार्य करीत आहे, ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी गरजवंतांना शोधून मदत करा़ एकाच ठिकाणी गर्दी होईल असे कृत्य करू नये़ स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला यावेळी क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांनी दिला़