Corona In Latur : लातूरकरांना दिलासा; सर्व ४२ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:17 AM2020-03-26T10:17:07+5:302020-03-26T10:17:38+5:30
बाहेर पडू नका, धोका कायम : जिल्हाधिकारी जी श्रीकांत
लातूर : लातूर जिल्ह्यातून पाठवलेले आजवरचे सर्वच्या सर्व 42 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, मात्र मुबंई, पुणे तसेच ज्या ज्या जिल्हयात लागण झाली आहे, येथून आलेल्यांनी दोन आठवडे बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.
दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे म्हणाले एकही अहवाल प्रलंबित नाही. सर्व निगेटिव्ह आले आहेत, परंतु सर्वांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे, घर बाहेर पडू नये, अजून धोका टळलेला नाही. ज्यांची तपासणी झाली ते निगेटिव्ह आहेत, हे दिलासा देणारे आहे, मात्र जे फिरत आहेत, ज्यांना अद्याप लक्षणे नाहीत त्यांनी फिरणे टाळावे. त्यांना बाधा असेल तर ते त्यांच्या पुरते राहील अन्यथा प्रसार वाढेल.
जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर आणि सर्वच अधिकारी, प्रशासन कोरोना अटकाव साठी सज्ज आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. वैद्यकीय, किराणा यासाठी बाहेर पडले तर जास्त वेळ घालवू नये. दुकानांत अंतर ठेवून उभे रहावे. गर्दी करू नये. रुमाल बांधावा. घरी परतल्यानंतर हात साबणाने धुवा, स्वच्छतेची सर्व काळजी घ्या, मगच घरात जा, आपण जितके बाहेर जास्त पडाल तितका धोका अधिक आहे, असे कळविण्यात आले आहे.