Corona In Latur : ना मास्क ना सॅनिटायझर ; लातूर जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 02:51 PM2020-03-26T14:51:17+5:302020-03-26T14:53:01+5:30
स्वयंसेविकांना सुरक्षेची कोणतीच साधने देण्यात आली नसल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरी व ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी घरोघरी जाऊन हात कसे स्वच्छ धुवावेत, बाहेर गावाहून कोणी आले का, काही लक्षणे असतील तर त्यांना रुग्णालयात पाठविण्याचे काम करीत आहेत, दररोज त्यांचा शेकडो लोकांशी संबंध येतो. मात्र याच स्वयंसेविकांना सुरक्षेची कोणतीच साधने देण्यात आली नसल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात जवळपास 1 हजार 690 व शहरी भागात शंभराहून अधिक आशा स्वयंसेविका, गतप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन उत्तम आरोग्याचा सल्ला देण्याचे काम करीत आहेत. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. हात कसे धुवावेत, घरात कशी काळजी घ्यावी, मुंबई-पुण्यासह अन्य भागातून गावात आलेल्या व्यक्तीची माहिती कशी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. तदनंतर दुसऱ्या दिवसांपासून आशा स्वयंसेविका कामाला लागल्या. पहिल्या दिवशी सोबत आलेले शिक्षक अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी तर गायब झाले, अंगणवाडी सेविकाही अनेक गावात आशासोबत कार्यरत नसल्याची ओरड आहे.
कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका सर्वेक्षनाचे काम करीत आहेत, पण त्यांना अजूनही ना मास्क आहेत, ना सॅनिटायझर.घरोघरी जाऊन त्या साबणाने हात धुवून नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तोंडाला ओढणी किंवा रुमाल बांधून इतरांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची सुरक्षा दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे.दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी एक आदेश काढला असून दोन मास्क आणि 500 मिली सॅनिटायझर खरेदीला परवानगी दिली आहे.
मास्क, सॅनिटायझर खरेदीचे आदेश
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी गुरुवारी पत्र काढले आहे. आशा स्वयंसेविका यांनी ग्राम आरोग्य पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समिती मार्फत दोन कापडी मास्क, 500 मिली सॅनिटायझर खरेदी करावेत. तर गतप्रवर्तक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत दोन मास्क, सॅनिटायझर,तालुका समूह संघटक यांनी आपल्या सादिल निधीतून साहित्य खरेदीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतल्याने दिलासा मिळाला आहे.