कोरोना परतू लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:00+5:302021-07-22T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्या गावाकडे आलेले अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी मुंबई-पुण्याकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्या गावाकडे आलेले अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी मुंबई-पुण्याकडे परतत आहेत. पहिल्या लाटेत मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, नाशिक याठिकाणी काम करणारे कामगार गावी परतले होते. त्यामुळे तालुक्यातील गावे-वाडी माणसांनी गजबजून गेल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी परतले असून, आपल्या कामावर हजर झाले आहेत. तालुक्यातील काळेगाव येथील ४० ग्रामस्थ परदेशातून आले होते. सौदी अरेबियामध्ये विविध प्रकारची कामे ते करत होते. मात्र, येथे आल्यानंतर परत जाण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्हिसा ब्लॉक करण्यात आला असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत, अशा दहाजणांना आपल्या कामाच्या ठिकाणी परतावे लागले आहे.
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे...
मुंबई १३००
पुणे ७००
निजामाबाद १५०
हैदराबाद २००
सौदी अरेबिया ६०
सौदी अरेबियाहून काळेगाव येथील ६० कामगार आपल्या गावी आले होते. त्यांचे वेळेत लसीकरण न झाल्यामुळे काही कामगारांच्या हातचे कम गेले आहे. काही कामगार आता गावातच रोजगाराच्या शोधात आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. - अब्दुल शकूर जागीरदार, उपसरपंच, काळेगाव
गावात साडेसातशे लोकसंख्या असून, साडेतीनशेहून जास्त नागरिक पुणे, मुंबई याठिकाणी काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हे सर्व नोकरदार आपापल्या नोकरीच्या ठिकाणी गेले आहेत. अनेकांनी लसीकरण पूर्ण करुनच नोकरीचे ठिकाण गाठले आहे. - जगन्नाथ पुणे, सोनखेड
शिक्षणासाठी मुले विदेशात असणाऱ्यांना चिंता...
ज्या पालकांची मुले शिक्षणासाठी विदेशात आहेत, त्यांना चिंता वाटत आहे. आपल्या मुलांसोबत दररोज फोनवर संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. दरम्यान, मुले शिक्षणासाठी परदेशात असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांना सुट्टीत मूळगावी येता आले नाही.