Corona Virus: लातूर जिल्ह्यात आज २२७ बाधित तर ३९६ जण उपचारानंतर ठणठणीत बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:32 PM2022-02-03T19:32:32+5:302022-02-03T19:33:40+5:30
Corona Virus: जिल्ह्यात १८२७ रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट १४ टक्क्यांवर आहे
लातूर : कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी होत चालले असून, पॉझिटिव्हीटी रेट १४.२ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २२७ जणांना कोरोनाची बाधा झाली तर ३९६ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८२७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ५६ रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. तर ३८ रुग्ण कोविड सेंटरमध्ये असून, उर्वरित १ हजार ७३३ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ७५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन, ८५२ व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ५५ जण बाधित आढळले आहेत. दोन्ही मिळून १ हजार ६०३ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात नवे २२७ रुग्ण आढळले आहे. या चाचण्यांतील पॉझिटिव्हीटी रेट १४.२ टक्के आहे. सध्या उपचार घेत असलेल्या १ हजार ८२७ रुग्णांपैकी ३३ रुग्ण डीसीएचमध्ये, २३ रुग्ण डीसीएचसीमध्ये आणि ३८ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित १ हजार ७३३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. संसर्ग थोडा कमी झाला असला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तीन लाटेमध्ये आतापर्यंत १ लाख ४ हजार १३४ रुग्ण आढळले असून, यातील ९९ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत २ हजार ४६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी दिली.
बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर...
सध्याचा पॉझिटिव्ही टरेट १४.२ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८८ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्येतही २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान, गुरुवारी ३९६ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली.