Corona Virus : ...त्यांना कोरोना गाठणार, तिसऱ्या लाटेबाबत इंदुरीकर महाराज म्हणतात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:19 PM2022-01-13T16:19:25+5:302022-01-13T16:20:28+5:30
Corona Virus : कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत
लातूर - प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं विधान म्हणजे चर्चा तर होणारच. त्यात कोरोना आणि लसीकरणावर महाराज बोलल्यास त्याची जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी आपण लसीकरणासंदर्भात जागृती करणार असल्याचं इंदुरीकर महाराजांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना म्हटलं होत. आता, महाराजांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य केलंय. आपल्या किर्तनातून समाजजागृती करताना महाराज प्रसंगारुप उदाहरणे देताना आपण पाहतो.
कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण, आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्मच आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता, तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं महाराजांनी म्हणतात, जोरदार हशा पिकला. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात महाराजांनी तिसाऱ्या लाटेबाबत भाष्य केलं.
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातही कोरोनावर भाष्य करण्यात आलंय. एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, की कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म असल्याचं महाराजांनी म्हटलं. महाराजांच्या या वाक्यावर किर्तनाला जमलेल्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली.
दरम्यान, यापूर्वी आपण लस घेणार नसल्याचं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराजांना किर्तनातून जनजागृती करण्याचं सूचवलं होत. त्यानंतर, महाराजांनीही आपण जगजागृती करण्याचे आश्वासन टोपेंना दिलं होतं. त्यानंतर, त्याचा श्रीगणेशाही इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथून केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त तेथे कीर्तन पार पडले होते.