उदगीरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा होता त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:00 PM2020-05-17T15:00:59+5:302020-05-17T15:01:18+5:30
रुग्ण ६५ वर्षीय वृद्ध, मधुमेह, रक्तदाब आणि न्यूमोनियाग्रस्त
लातूर : उदगीर शहरातील आनंद नगर भागातील कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच न्यूमोनियाही झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. दरम्यान उदगीरमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे.
कोरोनाबाधित रुग्ण उदगीरमध्येच वास्तव्याला होता. मात्र त्याच्या घरातील इतर सदस्यांचे बीदर जिल्ह्यात येणे जाणे होते. सदर रुग्णास श्वसनाला त्रास होत असल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखवण्यात आले, त्यानंतर शासकीय दवाखान्यात आणल्यानंतर कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाच्या परिवारातील ९ जणांचे स्वब घेण्यात आले आहेत. तसेच संपर्कात आलेल्या खाजगी डॉक्टर, कर्मचारी तसेच इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही तपासणी होणार आहे.
एकट्या उदगीर शहरात आजपर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. प्रारंभी एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. रविवारी दुसरा बळी गेला. सद्यस्थितीत १८ जणांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे. तर २१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच निलंगा येथे आढळलेले ८ यात्रेकरूही कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. एकूण जिल्हयाचा कोरोना रुग्ण आलेख ४९ वर पोहचला आहे.