coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३ पॉझिटिव्ह; दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:15 PM2020-06-19T20:15:11+5:302020-06-19T21:26:20+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी एकूण ३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी आणखी ३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी एक रुग्ण लातूर शहरातील माताजी नगर येथील असून, दुसरा औसा येथील मलंग गल्ली व तिसरा निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील आहे. आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख २२० वर पोहोचला आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या मदनसुरी येथील ६५ वर्षीय रुग्णाचा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तर औसा तालुक्यातील अंदोरा येथील एकाचा मृत्यू झाला.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी एकूण ३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सदर रुग्ण १८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान लातूर येथील रुग्णालयात दाखल झाला होता. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा हे आजार बºयाच वर्षांपासून होते. सदर रुग्णास श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून व्हेंटिलेटरवर होता. उपचारादरम्यान रक्तदाब व रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील अंदोरा येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर सद्य:स्थितीत ६८ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत असून, आतापर्यंत १३९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.