coronavirus : लातूर जिल्ह्यात ३ पॉझिटिव्ह; चौघांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 07:26 PM2020-06-17T19:26:25+5:302020-06-17T19:27:12+5:30
चौघा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील दोघे लातूर शहरातील मोती नगर येथील आहेत.
लातूर : जिल्ह्यात बुधवारी ३ नवे रुग्ण आढळले असून, चौघांनी कोरोनावर मात केली आहे. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४ असून, कोरोना बाधितांचा आलेख २११ वर पोहोचला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत बुधवारी एकूण ५२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तिघांचे पॉझिटिव्ह तर दोन अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या ३ पैकी १ व्यक्ती लातूर शहरातील भोई गल्ली येथील असून, दोघेजण उदगीर येथील आहेत. बुधवारी लातूर येथील ३८ व्यक्तींचे स्वॅब तपासले. त्यापैकी ३६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एक पॉझिटिव्ह, एक अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला आहे. तर उदगीर येथील १४ पैकी ११ अहवाल निगेटिव्ह आले असून, २ पॉझिटिव्ह आणि एक अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी, चौघा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील दोघे लातूर शहरातील मोती नगर येथील आहेत. यातील एक ६८ वर्षीय महिला १९ दिवस रुग्णालयात दाखल होती. त्यापैकी १२ दिवस व्हेंटिलेटरवर होती. तिने कोरोनावर मात केली असून, अन्य दोन रुग्ण उदगीरचे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.