CoronaVirus : उदगीर येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या १५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 07:28 PM2020-05-05T19:28:25+5:302020-05-05T19:29:04+5:30
एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
लातूर : उदगीर येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी उदगीर येथील ८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर एकाची पुनर्तपासणी होणार आहे.
उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित मयत महिलेसह एकूण बाधितांची संख्या १५ असून १४ जणांवर उपचार सुरू आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत मंगळवारी एकूण १७ स्वॅबची तपासणी झाली. त्यापैकी उदगीर येथून आठ स्वॅब आले होते. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर एका व्यक्तीच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार आहे. उर्वरित सहा अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, मंगळवारी घेतलेल्या १७ स्वॅबमध्ये ९ व्यक्तींचे स्वॅब बीड जिल्ह्यातील होते. ते सर्वच कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील बाह्य रुग्ण विभागात मंगळवारी ८ ते दुपारी ४ पर्यंत ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील एकातही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. या संस्थेअंतर्गत आजपर्यंत २०० व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी संपला असून, एकूण सद्य:स्थितीत २० व्यक्ती जिल्हा आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारोती कराळे यांनी दिली.