coronavirus : कोरोना उपचारात बीसीजी इंजेक्शनचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:34 PM2020-05-20T16:34:51+5:302020-05-20T16:37:22+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
लातूर : कोविड १९ च्या उपचारात बीसीजी इंजेक्शनचा प्रयोग हाफकिन तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रात काही ठिकाणी केला जात आहे़ त्याचा उपचारामध्ये कसा लाभ होत आहे, याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़
देशमुख म्हणाले, लहानपणी आपण सर्वांनीच बीसीजी इंजेक्शन घेतले आहे़ त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती अधिक आहे़ हाफकिनकडूनही लस संशोधनावर काम सुरू आहे़ जगभरात प्रयत्न सुरू आहेत़ तोपर्यंत २०२० वर्षे सावध राहण्याचे वर्ष आहे़ वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार घेतला त्यावेळी तसेच कोरोनाच्या आधी राज्यात ४ लॅब सुरू होत्या़ गेल्या काही दिवसात वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यभरात ८० लॅब सुरू केल्या आहेत़ त्यामुळे सिंधुदुर्ग असेल की लातूर जिल्ह्यातील जळकोट या सर्व गावांच्या जवळ कोविड १९ ची चाचणी होत आहे़ परिणामी चाचण्या वाढल्या़ महाराष्ट्रात ३ लाखांवर तपासण्या झाल्या आहेत़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार केला आहे़ त्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य हवे आहे.