coronavirus : हृदयविकाराने झाला मृत्यू ; कोरोनाच्या अफवेने मात्र अंत्यसंस्काराला आले फक्त दहा जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:09 PM2020-03-18T18:09:23+5:302020-03-18T18:13:37+5:30
गावात अज्ञाताने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची अफवा पसरविली.
लातूर : शहराजवळील रूई रामेश्वर गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला; परंतु संबंधिताला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी अंत्यसंस्कारप्रसंगी अत्यंत जवळचे दहा-बाराजणच उपस्थित राहिले़ दरम्यान, अशी अफवा पसरविणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे़
रामेश्वर (रुई) येथील एक ५५ वर्षीय अविवाहित व्यक्ती वरवण (जि. पुणे) येथील एका शेतात राहत होते. त्यांना आई, दोन भाऊ असून त्यांचे कुटुंब विभक्त आहे़ दरम्यान, गेल्या मंगळवारी ते गावाकडे आले होते़ थंडी, ताप भरल्याने सोमवारी त्यांचा मृत्यू झाला़ परंतु, गावात अज्ञाताने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची अफवा पसरविली. या घटनेची माहिती आरोग्य व पोलीस प्रशासनास मिळाली़ त्यामुळे आरोग्य पथकाने माहिती घेऊन पार्थिव लातुरात शवविच्छेदनासाठी पाठविले़ अखेर मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़