CoronaVirus : औशाच्या ‘त्या’ तरुणाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 07:27 PM2020-03-31T19:27:38+5:302020-03-31T19:30:48+5:30
औसा तालुक्यातील एका गावात चार दिवसांपुर्वी एक युवक आला आहे़ तो पुणे येथे राहत होता़
लातूर : कोरानाची बाधा झाल्याच्या संशयावरून औसा तालुक्यातील एका युवकास सोमवारी रात्री लातुरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल केले होते़ मात्र या तरुणाच्या स्वॅबचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे़ आतापर्यंत ६९ जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून, त्यापैकी ६४ जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ़संजय ढगे यांनी सांगितले़
औसा तालुक्यातील एका गावात चार दिवसांपुर्वी एक युवक आला आहे़ तो पुणे येथे राहत होता़ दरम्यान त्याच्या पुण्यातील मित्राला कोरोनाची बाधा झाली होती़ त्यामुळे त्याला सोमवारी रात्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते़ या तपासणीचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून, तो कोरोना निगेटिव्ह आहे़ दरम्यान, शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातून आतापर्यंत ६९ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत़ त्यापैकी ६४ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत़ मंगळवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत २०७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली़ आतापर्यंत ४ हजार १०५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, परदेश प्रवास केल्याची पार्श्वभुमी असलेल्या ६९ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत़ त्यातील ६४ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत़ उर्वरीत ५ अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हा शैल्य चिकीत्सक डॉ़ढगे यांनी सांगितले़