coronavirus : आनंददायक ! १० पॉझिटिव्ह मातांच्यापोटी निगेटिव्ह गोंडस बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:10 PM2020-07-28T14:10:42+5:302020-07-28T14:12:19+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यशस्वी उपचार
- हरी मोकाशे
लातूर : कोरोनामुळे प्रत्येकजण सुरक्षेसाठी अंतर ठेवून राहत आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत गरोदर मातांची तर घालमेलच होत आहे. काळजी घेऊनही ३१ गरोदर मातांना नकळतपणे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यशस्वी उपचार करण्यात आल्याने १० पॉझिटिव्ह मातांनी निगेटिव्ह गोंडस बाळांना जन्म दिला आहे, तर १५ माता कोरोनामुक्त झाल्या आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ७२५ खाटा असून अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. कोरोनाच्या संकटामुळे तर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या आणखीन वाढली आहे. या वैद्यकीय संस्थेत लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत ४ हजार ६२७ गरोदर मातांनी सुरक्षित बाळंतपणासाठी उपचार घेतले आहेत. त्यातील २ हजार ४४ मातांची नैसर्गिक तर १ हजार ४१५ मातांवर प्रसूतीसाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
सुरुवातीस बाळंतपणासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या मातांची कोरोना चाचणी करण्यात येत असे. आता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास सुरक्षेसाठी म्हणून ही चाचणी केली जात आहे. दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत उपचारासाठी आलेल्यांपैकी ३१ गरोदर मातांना नकळतपणे कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यातील बहुतांश मातांना धक्काच बसला. अशा परिस्थितीत स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ. भाऊराव यादव, डॉ. अण्णासाहेब बिरादार, डॉ. अनिता पवार, डॉ. शीतल लाड, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. विष्णू तरसे यांनी आणि कोरोना विलगीकरण कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्याबरोबरच समुपदेशन केले. त्यामुळे २५ माता कोरोनामुक्त झाल्या. यातील १० माता कोरोनाग्रस्त असतानाच त्या बाळंत होऊन निगेटिव्ह गोंडस बाळांना जन्म दिला.
गुंतागुंतीच्या ९०८ मातांवर उपचार...
जिल्ह्याबरोबरच उस्मानाबाद, उमरगा व अन्य काही ठिकाणच्या गरोदर मातांचे बाळंतपण हे गुंतागुंतीचे असल्याने त्यांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली असल्याची माहिती स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला शिंदे, सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ. भाऊराव यादव यांनी दिली.
घरातील मंडळींचा आनंद गगनात मावेना...
प्रसूतीसाठी वैद्यकीय संस्थेत आलेल्या गरोदर महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या सर्व कुटुंबियांना धक्काच बसला होता. अशा परिस्थितीत औषधोपचार देण्याबरोबर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने समुपदेशन करण्यात आले. कोरोनाग्रस्त असतानाच त्यांची प्रसूती झाली. एकीकडे बाळ झाल्याचा आनंद तर दुसरीकडे कोरोनामुळे चिंता अशी स्थिती होती. उपचारानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या आणि निगेटिव्ह बाळासह कोरोनामुक्त मातांना घरापर्यंत सोडण्यात आले.