CoronaVirus : डॉक्टर, दिवसभरात हात किती वेळा धुवायचा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:27 PM2020-04-03T12:27:09+5:302020-04-03T12:28:14+5:30
कोरोनाच्या धास्तीने दररोज किमान दोघे घेताहेत मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला
- हरी मोकाशे
लातूर : डॉक्टर, दिवसभरात हात किती वेळा धुवायचे? थोडीशी सर्दी, खोकला आहे, त्यामुळे तो कोरोना असू शकतो का? असे भीतीवजा प्रश्न मानसिक तणावाखाली असलेले किमान एक- दोघेजण दररोज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील मानसोपचार तज्ज्ञांकडे मांडत आहेत़ त्यामुळे आजाराची काळजीबरोबर ताणतणावही वाढलेला पहावयास मिळत आहे़
गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे़ देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत़ त्यास रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे़ घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असे आवाहन करीत पंतप्रधानांनी संचारबंदी केली आहे़ कारवाईमुळे प्रत्येकजण स्वत:च्या आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी घरीच थांबत आहेत़ दरम्यान, बहुतांश मंडळींच्या हाती मोबाईल असल्याने सोशल मिडियावर नजर टाकली असता दिवसभर कोरोना आशयाच्याच पोस्ट आहेत़
सातत्याने कोरोनाच्या पोस्ट पाहून काही मध्यमवयीन व्यक्तींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत़ त्यामुळे निद्रानाश, चिडचिडेपणा, सतत नकारात्मकता दिसून येत आहे़ यातील तणावग्रस्त असलेले दररोज किमान एक- दोन व्यक्ती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मनोविकार विभागात दाखल होऊन सल्लावजा उपचार घेत आहेत़ मनोविकार तज्ज्ञ डॉ़ आशिष चेपुरे म्हणाले, कोरोनाबद्दल एकच गोष्ट वारंवार ऐकत राहिल्यामुळे काहींमध्ये भीतीची मानसिकता उद्भवत आहे़ त्यामुळे त्यांच्या अस्वस्थपणा, ताणतणाव दिसून येत आहे़ मात्र, अशा आजाराच्या व्यक्तींची संख्या अत्यंत कमी आहे़ आम्ही त्यांना धीर देत त्यांच्या शंका, समस्यांचे निरसण करीत आहोत़ तरीही भावनिक, वर्तणुकीत बदल झाला असल्यास तात्काळ उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे़
चिंता करु नका, घरातच थांबा
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने घरातच थांबावे़ कुठल्याही पोस्टवर फारशी चिंता करु नका़ घरात थांबून कुटुंबियांसोबत मनमोकळा संवाद साधा़ आपले छंद जोपासा़ व्यसनापासून अलिप्त राहून आपले आरोग्य सुदृढ ठेवा़, असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील मानसोपचार विभागप्रमुख डॉ़ आशिष चेपुरे यांनी केले़
मंत्रचळच्या रुग्णांत अधिक चिंता
मंत्रचळ प्रकारच्या रुग्णांत अधिक चिंता व स्वत:मध्ये आत्मविश्वास कमी असतो़ यातील स्वच्छतेसंदर्भात रुग्ण दिवसभरात अगणिक वेळा हात धुवतात़ काही वेळेस त्यांना आपण विनाकारण हात धुवत असल्याचे जाणवते़ परंतु, ते स्वत:ला थांबवू शकत नाहीत़ त्यांना यापूर्वी औषधोपचार सुरु असल्यास त्यात खंड पडू देऊ नये, असेही डॉ़ चेपुरे यांनी सांगितले़