CoronaVirus : लातुरात रस्त्यावर थुंकणे पडले महागात; तिघांवर झाली दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 03:41 PM2020-04-14T15:41:08+5:302020-04-14T15:41:59+5:30
मास्क न वापरल्याने एकाला दंड
लातूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना मास्क लावता घराबाहेर पडणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काढले आहेत. त्यानुसार मंगळवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी तिघांवर कारवाई केली आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या दोघांना प्रत्येकी 500 रुपये व मास्क न लावता बाहेर पडणाऱ्या एकाकडून 200 रुपयांचा दंड घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिलाधिकारी जी.श्रीकांत यांनी संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी गंजगोलाई येथे एका किराणा दुकानासमोर थुंकणाऱ्या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लातूर शहरात महापालिका कर्मचारी कारवाई मोहीम राबवित आहेत. आदेश निघाल्यावर पहिल्याच दिवशी तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघांकडून 1 हजार व मास्क न लावता बाहेर पडलेल्या एकाकडून 200 रुपये दंड घेण्यात आला.
सावधान मास्क न लावता बाहेर निघू नका...
लातूर शहरात मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सुपारी, तंबाखू खाऊन रस्त्यावर पिचकारी मारनेही अवघड होणार असून याचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागणार आहे.बुधवारपासून याची अंमलबाजवणी कडक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.