Coronavirus In Latur : जिल्ह्यात आणखी ६४ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:44 PM2020-07-17T16:44:49+5:302020-07-17T16:50:06+5:30
९७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर : जिल्ह्यात गुरुवारी तपासण्यात आलेल्या ४६२ स्वॅबपैकी ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आणखी १०७ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, शुक्रवारी १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४५२ पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ४६२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, १०७ प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लातूर तालुक्यातील २०, निलंगा १२, चाकूर ८, उदगीर १२, देवणी ३, औसा ६ आणि अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६४ जणांचा समावेश आहे. लातूरनजिक असलेल्या सीआरपीएफ कॅम्प येथील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर लातूर शहरात पठाण नगर, शाम नगर, गुमास्ता कॉलनी, अहिल्यादेवी होळकर नगर, आदर्श कॉलनी, इस्लामपुरा, माताजी नगर, गुळटेकडी जुना औसा रोड, गवळी गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ६११ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५२ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
१३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी...
रुग्णसंख्या वाढत असली, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. आतापर्यंत ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या १० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली असल्याने त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. तसेच कोविड केअर सेंटर उदगीर, कोविड केअर सेंटर दापका ता. निलंगा आणि १ हजार मुला-मुलींचे वसतिगृह कोविड केअर सेंटर एमआयडीसी येथील प्रत्येकी एकाने कोरोनावर मात केली आहे. एकूण १३ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली.