CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:42 PM2020-04-18T23:42:01+5:302020-04-18T23:44:28+5:30
सर्व यात्रेकरुंना आंध प्रदेशला पाठवणार; पालकमंत्र्यांची माहिती
लातूर : जिल्ह्यातील आठही कोरोनाबाधितांच्या दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, यात्रेकरुंचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आंध्र प्रदेशात घरी पाठविणार, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात आलेल्या १२ यात्रेकरुंपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वीच पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येईल असे सांगितले होते. हे सर्व १२ यात्रेकरु हरयाणा येथून विविध राज्यांच्या सीमा ओलांडत निलंगा मार्गे आंध्रप्रदेशात जात होते. कर्नुल जिल्ह्यातील नंदियाला हे त्यांचे गाव आहे. दरम्यान, सर्व बाधितांचा क्वारंटाईन कालावधीही पूर्ण झाला आहे. आता सर्वांचीच रवानगी आंध्र प्रदेशात होईल. एकंदर लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, आता परप्रांतियही कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त म्हणता येईल. आजपर्यत २१३ अहवाल प्राप्त असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.