CoronaVirus : कोरोना विरुद्धच्या लढाईत सरसावला लातूरचा मदरसा; इमारतीत होणार विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:34 PM2020-04-08T17:34:58+5:302020-04-08T17:35:55+5:30
कोरोनाच्या विषाणूच्या लढ्यात आपले योगदान देण्यासाठी मदशाची इमारत विलगीकरण कक्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला
लातूर : शहरातील साई रोडवरील (आर्वी ) सय्यद नगर भागात असलेल्या मदरसा दारूल उलुम सिद्दिकियाची इमारत कोरोना रूग्णांसाठी वापरण्यात यावी, असा प्रस्ताव मदरशाचे प्रमुख तथा जमियत ए उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इस्राईल रशिदी यांनी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांना दिला आहे़.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ देशभरातही रूग्णसंख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाच्या विषाणूच्या लढ्यात आपले योगदान देण्यासाठी मदशाची इमारत विलगीकरण कक्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. याठिकाणी मुस्लिम समाजातील मुले धार्मिक शिक्षण घेतात़. सध्या कोरोनामुळे मदरशातील मुले सुटीवर असल्याने जवळपास १७ खोल्या रिकाम्या आहेत़ याठिकाणी भव्य इमारत असून शहराबाहेर असल्याने वातावरणही अतिशय चांगले आहे़.
मदरशात विलगीकरणातील रूग्णांना ठेवल्यास त्यांना जेवणाचीही सुविधा आपण उपलब्ध करून देऊ, असा मानस मौलाना इस्राईलसाब यांनी व्यक्त केला़. संकट काळात मदतीसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे़. एरव्ही मुलांच्या किलबिलाटाने गजबजलेला परिसर सध्या मदरशाला सुटी असल्याने शांत आहे़. दरम्यान, मौलाना इस्राईलसाहब यांनी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या १०० कुटुंबांना महिनाभर पुढेल एवढे धान्य, किराणा साहित्यही वाटप केले आहे़.
संकटकाळात मदत होईल़़
कोरोना विषाणूची लढाई संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाची व संयमाची आहे़ यात सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे़. कोरोना विलगीकरण कक्षासाठी मदशाचा वापर करावा, असे मी स्वत: जिल्हाधिकारी जी़श्रीकांत यांना कळविले असून त्यांच्याकडून मला प्रतिसाद मिळाला आहे़. आम्ही मदशात रूग्णांना जेवणाचीही सुविधा उपलब्ध करून देऊ़.
- मौलाना इस्राईल रशिदी, प्रमुख, मदरसा दारूल उलुम सिद्दिकिया़