CoronaVirus News in Latur : वैद्यकीय तपासणीनंतर महिलेस घंटागाडीतून पाठविले घराकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:16 AM2020-05-21T03:16:45+5:302020-05-21T03:17:24+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती़ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला.
औसा (जि. लातूर) : पुण्याहून औश्यात आलेल्या एका महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला पालिकेच्या घंटागाडीत बसवून होम क्वारंटाईनसाठी घराकडे पाठविल्याची घटना मंगळवारी रात्री औसा येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास बुधवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला़ रात्रीची वेळ असल्याने तिला एकटीला घराकडे जाणे शक्य होत नव्हते़ तेव्हा तिला रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडणे गरजेचे होते़ मात्र, कुठलीही सुविधा उपलब्ध झाली नाही़ दरम्यान, तेथील उपस्थित स्वच्छता निरीक्षकाने पालिकेच्या घंटागाडीच्या मागील गॅलरीत बसवून महिलेला घरी सोडले़
वास्तविक पहाता, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आहे तर संस्थात्मक विलगीकरणासाठी तीन वाहनांची सोय आहे़ मात्र, एकही वाहन उपलब्ध झाले नाही़
याप्रकरणी संबंधित स्वच्छता निरीक्षकास नोटीस बजावली असून, त्याचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले़