Coronavirus : कोरोनाने मृत्यू झाल्याच्या अफवेने अंत्यसंस्काराला केवळ १0 जण उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:23 AM2020-03-18T06:23:11+5:302020-03-18T06:24:03+5:30
एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत जवळचे दहा-बारा नातेवाईकच उपस्थित राहिले.
लातूर : रूई रामेश्वर गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला़ परंतु, त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत जवळचे दहा-बारा नातेवाईकच उपस्थित राहिले. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
लातूर तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथील एक ५५ वर्षीय व्यक्ती पुण्याजवळील वरवण येथील एका शेतात गेल्या काही वर्षांपासून राहत होती. ते अविवाहित होते़ त्यांना आई, दोन भाऊ, भावजय, पुतणे असे नातवाईक आहेत. रामेश्वर येथे त्यांच्या आई राहतात़ दोन दिवसांनी ते मित्राच्या मुलाच्या विवाहास गेले होते़ त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांच्या अंगात थंडी, ताप भरला़ त्यामुळे गावातील डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सुरुवात केली़ मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला़ परंतु, गावात अज्ञाताकडून त्यांना कोरोनासंसर्ग झाल्याचे चुकीचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती आरोग्य व पोलीस प्रशासनास मिळाली़ त्यामुळे आरोग्य पथकाने माहिती घेऊन पार्थिव लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले़ अखेर मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करुन दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़
कोरोनाग्रस्त ठरविले
उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडला गेला होता़ तो नुकताच गावी परतला आहे़ मात्र, कोरोनाच्या भयगंडाने पछाडलेल्या नातेवाईकांनी त्यास बळजबरीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. हा व्यक्ती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे़