coronavirus : लातूरात अकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई;अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:10 AM2020-03-24T11:10:21+5:302020-03-24T11:12:22+5:30
किराणा,दूध आणि औषधी दुकानेच सुरू राहणार
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सकाळच्या वेळी काम नसताना रस्त्यांवर फिरणाऱ्यांचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे सकाळी १० नंतर रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला.
शहरात औषधी, किराणा, दूध आणि अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने सुरू आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करताच पोलिसांनी नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले. तर काहीच काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी चालकांना पोलिसांनी लाठ्यांचा मार दिला. त्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, खाजगी, शासकीय सर्वच वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
खाजगी दवाखान्यातील ओपीडी बंद...
लातूर शहर तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील ओपीडी बंद असणार आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा रुग्णालयात मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थिती असेल तर १०८, १०४ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.