CoronaVirus उपचार करणाऱ्या २५ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे अहवालही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:56 PM2020-04-08T23:56:11+5:302020-04-08T23:56:16+5:30
लातूरकरांना दिलासा : आठ कोरोना बाधितांपैकी तिघे निगेटिव्ह
लातूर : निलंग्यातून आणलेल्या परप्रांतीय ८ कोरोना बाधितांपैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी अशा एकूण २५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने लातूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत बुधवारी दुपारपर्यंत एकूण ४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण १४० व्यक्तींचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४ एप्रिल रोजी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ७ आणि ८ एप्रिल रोजी ३४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६ स्वॅब पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाºयांची होती. २६ पैकी २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ८ व्यक्तींचे स्वॅब फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार जणांची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. तर तिघा व्यक्तींची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. एकाचा अहवाल प्रलंबित आहे. ही बातमी लातूरकरांसाठी दिलासादायक आहे. आजपर्यंत एकूण ४३ व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे. इतर ५३ व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तर ३७ व्यक्तींना संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विलगीकरण कक्ष प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
लातूरकरांनी घाबरू नये...
सद्य:स्थितीत लातूरकरांना दिलासा मिळाला असून, कोणीही घाबरू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, प्राथमिक तपासणीनंतर कोरोना आजारासारखी लक्षणे आढळल्यास अथवा कोरोना बाधित, संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना, प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथील विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उदगीर आणि लातूर येथे आयसोलेशन बेडची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असेही ते म्हणाले.