Coronavirus : धक्कादायक ! उदगीरमध्ये एकाच दिवशी १० कोरोना पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:15 PM2020-05-16T21:15:48+5:302020-05-16T21:16:28+5:30
लातूर शहरातील सर्व अहवाल निगेटिव्ह
लातूर : मुंबईहून उदगीर जवळील गावाकडे आलेल्या १० जणांचे अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, उदगीरमधून एकूण १७ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. त्यात उर्वरित चार निगेटिव्ह तर तीन प्रलंबित आहेत. तर लातूर शहरातील ७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून, ते सर्व निगेटिव्ह असल्याचे अधीष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई येथून अनेक लोक आपापल्या गावी परतत आहेत. दोन दिवसांपूर्वी उदगीर जवळच्या एका तांड्यावर १२ जण आले. परंतु, गावकºयांनी त्यांना सीमेवर थांबविले. तद्नंतर उदगीर येथील क्वारंटाईन केंद्रामध्ये त्यांना दाखल केले व स्वॅब तपासणीला पाठविले. त्यातील १० जण पॉझिटिव्ह तर दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील २४ जणांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी आले होते. त्यात उदगीरचे १७ तर लातूरचे ७ होते. दरम्यान, उदगीरमधून एकाच दिवशी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत उदगीरमध्ये मयत महिलेसह ३१ रूग्ण आढळले होते. त्यात दहाची भर पडून एकूण उदगीरची रूग्णसंख्या ४१ झाली आहे. त्यातील २१ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेले आहेत. प्रारंभी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर १९ जणांवर उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.